आंतरवली सराटीवरून मुंबईकडे मोर्चा; फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक जरांगेंच्या भेटीस
बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उद्या आंतरवली सराटीवरून हजारो बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली असून, या भेटीमुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना राजेंद्र साबळे म्हणाले की, “आंदोलनादरम्यान येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये, त्यांचा मार्ग काय असेल हे जाणून घेण्यासाठी आलो आहे.” तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हे आंदोलन पुढे ढकलता येईल का, अशी विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या ठाम असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर तडजोड होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता मराठा मोर्चा मुंबईत किती जोरदार उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








