बीड : ऑनलाईन रिपोर्टर
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. सोमवारी गेवराई शहरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांत राडा झाला होता. यावेळी हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.घटनेनंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानुसार वडीगोद्री आणि अंतरवली सराटीच्या वेशीवर RCP आणि SRPF च्या प्रत्येकी दोन कंपन्या, ५ डीवायएसपी, ८ पीआय, २६६ अधिकारी-कर्मचारी आणि १६५ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी कालच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे. याचसोबत न्यायालयाने परवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलनास बंदी घातल्याने पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील १५ दिवस बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आंदोलने, निदर्शने किंवा मोर्चे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.







