बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ आज (शुक्रवार) सकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मृत व जखमी पादचारी पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते. अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी काही क्षणांसाठी गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले तर जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृतांचा समावेश असलेली नावे (प्राथमिक माहितीप्रमाणे):
- विशाल श्रीकिसन काकडे, रा. शेकटे, ता. शेवगाव, जि. अहमदनगर
- अमोल नामदेव गरजे, रा. बोधेगाव, ता. शेवगाव
- आकाश कोळसे
- पवन जगताप
- किशोर तोर, रा. बाबुलतरा, ता. गेवराई (आणखी दोन जणांचा समावेश असून नावे अद्याप स्पष्ट नाहीत.)
अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरचा चालक पोलिसांच्या ताब्यात असून, अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ अशाच पद्धतीने कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महामार्गावरील भरधाव वेगाला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.
सविस्तर बातमी लवकरच…








