
पं.स.मध्ये काम सोडून कर्मचारी मोबाईलमध्येच व्यस्त
बीड (रिपोर्टर)ः- बीड पंचायत समितीमध्ये कामानिमित्त शेतकर्यांसह सर्व सामान्य नागरीक दररोज येत असतात. काही शेतकर्यांचे मस्टर काढायचे असते तर काही शेतकर्यांचे इतर कामे असतात. कामानिमित्त आल्यानंतर नागरीकांना कित्येक तास कार्यालयात ताटकळत थांबावे लागते. कार्यालयातील बहुतांश कर्मचारी कामे न करता रिकाम्या कामातच व्यस्त असतात. कर्मचार्यांच्या हातात स्मार्ट मोबाईल असल्याने हे कर्मचारी विविध प्रकारचे रिल बघण्यातच आपला जास्त वेळ घालवतात. कार्यालयीन कामकाज करण्याऐवजी कर्मचारी मोबाईलमध्ये जास्त व्यस्त राहत असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष घालायला हवे. बीड पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

विविध योजना, दाखले आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिक येथे येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खुर्चीवर बसून मोबाईल फोनवर सोशल मीडिया, चॅटिंग किंवा व्हिडीओ पाहण्यात मग्न असतात, असे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे.यामुळे एखादा नागरिक आपल्या कामासाठी त्यांच्याकडे गेल्यावर, त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. ’थोडा वेळ थांबा,’ असे सांगून त्यांना ताटकळत ठेवले जाते. काही वेळा तर मोबाईलमध्ये इतके गुंग होऊन जातात की, समोर आलेल्या व्यक्तीकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या एका नागरिकाने सांगितले की, मी माझ्या एका कामासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंचायत समितीमध्ये येत आहे. पण, साहेब त्यांच्या मोबाईलमध्ये एवढे व्यस्त असतात की, त्यांना भेटायलाही वेळ मिळत नाही.
आमचे काम कधी होणार? अशी व्यथा त्यांनी मांडली. अनेक वृद्ध आणि महिलांनाही अशाच अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. लांबून आलेल्या लोकांना तर याचा सर्वाधिक फटका बसत आहे, कारण त्यांचे येण्या-जाण्याचा खर्च आणि वेळेचा अपव्यय होतो. या गंभीर प्रश्नाकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शिस्त आणि कामाप्रती समर्पण असणे आवश्यक आहे. जर अधिकार्यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले नाही, तर शासनाच्या योजना आणि विकासकामे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत.या संदर्भात, जिल्हाधिकार्यांनी किंवा मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बीड पंचायत समितीला अचानक भेट देऊन या प्रकाराची पाहणी करावी आणि दोषी अधिकारी-कर्मचार्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







