
संशयितावर गुन्हा दाखल, शोध सुरू
बीड (रिपोर्टर): एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये म्हणजेच कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पाचशे रुपयाच्या बनावट नोटा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जेव्हा एचडीएफसी बँकेच्या कर्मचार्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा संबंधित ग्राहकाबाबत संशय व्यक्त झाला असता त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज, नोटांवरील नंबर यासह अन्य बाबी तपासल्यानंतर संबंधित व्यक्तीवर बँक प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित व्यक्ती हा बीड नजीकच्या पिंपरगव्हण येथील असल्याचे सांगण्यात येते. प्रकरण बनावट नोटांचा असल्याने पोलीस या प्रकरणी गोपनीय पद्धतीने तपास करत असल्याचे सांगीतले जाते.
याबाबत अधिक असे की, गेल्या महिन्याभरापूर्वी अहिल्यानगर आणि संभाजीनगर येथून बनावट नोटा छापणार्या लोकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील एकाला ताब्यातही घेण्यात आले होते. त्या बनावट नोटा प्रकरणाचा तपास एकीकडे चालू असताना दुसरीकडे काल स्वराज्यनगर भागात असलेल्या एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये एक तरुण पाचशेच्या पाच नोटा टाकत असल्याचे निदर्शनास आले. मशीनने त्या नोटा बाहेर फेकल्या म्हणून उत्सुकतेपोटी आणि संशयीवृत्तीने बँकेच्या कर्मचार्यांनी तो सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहिला तेव्हा संबंधित व्यक्ती हा बनावट नोटा डिपॉझिट करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात आल्यानंतर बँक प्रशानाने शिवाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तो एचडीएफसी बँकेचा खातेदार असल्याचे समजते. विशेष म्हणजे बीड नजीकच्या पिंपरगव्हण येथील तो तरुण आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.






