
गौण खनिज माफियांचा धुडगूस – प्रशासन मूकदर्शक
बीड , (रिपोर्टर)ः- जिल्ह्याला वेढून असलेल्या बालाघाट डोंगररांगा आज अस्तित्वाच्या संकटात सापडल्या आहेत. गौण खनिज माफियांनी अक्षरशः डोंगर पोखरून टाकले, तर प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याची भावना जनतेत व्यक्त होत आहे.
मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त खनिज उपसा सुरू असून, अवैध उत्खननाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. जंगल, झाडी आणि डोंगररांगा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, भूजलपातळी झपाट्याने खाली जात आहे, मातीची धूप वाढत आहे आणि भविष्यात बीड जिल्हा ओसाड व उजाड होईल, अशी गंभीर भीती निर्माण होत आहे.
पर्यावरणप्रेमी व तज्ज्ञांचा इशारा जर बालाघाट वाचवले नाहीत, तर पुढच्या पिढ्यांना डोंगर, झाडं, निसर्ग यांची फक्त चित्रांतून ओळख करून द्यावी लागेल.जनतेच्या नजरेत प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. खनिज माफियांशी संगनमताचा संशय बळावत असून, पर्यावरण प्रेमी व नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आता प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई केली नाही, तर बालाघाटाचा फक्त इतिहासच उरेल, भूगोल नाही, असा सूर उमटू लागला आहे.







