
पडीक पडल्याने अनेकजण कचराही टाकू लागले
एसपी साहेब जागेचा सद्उपयोग करण्यासाठी धोरण आखा
बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या बाजुला आणि पोलीस अधिक्षकांच्या रेस्ट हाऊससमोर असलेल्या पोलीस कॉलनीची दुर्दशा मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. मोडकळीस आलेले वॉल कंपाऊंड आणि त्याठिकाणी कोणीही राहत नसल्याने संपूर्ण शहराची घाण आता तेथे आणून टाकली जात आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून शेजारीच रूग्णालय आणि लोक राहत असल्याने त्या रोगराईचा परिणाम सर्व सामान्यांसह रूग्णावर होवू लागला आहे. त्यामुळे सदरच्या पोलीस लाईनच्या जागेवर कंपाऊंड वॉल बांधण्यात यावा किंवा जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी पोलिसांच्या या जागेचा चांगला उपयोग करण्याहेतू या ठिकाणी तात्पुरते गार्डन अथवा सुसज्ज मैदान तरी करावे अशी मागणी होत आहे.जिल्हा रूग्णालयाला अगदी खेटून जुनी पोलीस लाईन आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी घरे बांधलेली होती.
त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी राहतही होते. मात्र येथील बिल्डींग मोडकळीस आल्या आणि तेथून सर्व कर्मचारी अन्यत्र गेले. सदरची पोलीस लाईनची जागा ही मोठी आहे. तिचा वॉल कंपाऊंडही अनेक ठिकाणी पडलेल्या अवस्थेत आहे. लपण्यासाठी जागा आहे. त्यामुळी काही गर्दुले, गंजेटी आणि बेवडे या रिकाम्या जागेत येवून बसतात. त्याच बरोबर शहरातील अनेकजण या ठिकाणी कचराही टाकू लागले आहेत. शेजारीच रूग्णालय आणि मध्य वस्ती असल्याने रोगराई वाढण्याचीही शक्यता आहे. या समोर जिल्हा पोलीस अधिक्षकांचे रेस्ट हाईस आहे. सदरच्या जागेचा सदउपयोग करण्याहेतू जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तेथील साफसफाई आणि कंपाऊंडवॉलची बांधणी करून त्या जागेत कोणी कचरा टाकणार नाही, दारूडे, गंजेटी, बेवड्यांसाठी ती जागा उपलब्ध होणार नाही. यासाठी दक्षता घ्यावी अशी मागणी या भागातून होत आहे.








