
पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या मुसक्या बांधल्या,
अपहरण झालेल्याची सुटका
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागनाथ नन्नवरे यांना दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करून नंतर एका चारचाकी वाहनात जबरदस्तीने अपहरण करण्यात आले आहे. ही घटना संपूर्णपणे मोबाईल कॅमेर्यात कैद झाली असून परिसरात व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.सदरच्या घटनेने प्रशासनातही खळबळ उडाली.
त्यांनी तात्काळ या प्रकरणाीच दखल घेत यातील आरोपीतांना भूम तालुक्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अपहरण झालेल्या नागनाथ नन्नवरे याचीही सुटका करण्यात आली आहे.सदरचा प्रकार का घडला याचा तपास पोलीस करत आहेत. बीड शहरानजीक असलेल्या गोरे वस्ती परिसरातून नागनाथ नन्नवरे या तरूणास दहा ते बारा लोकांच्या टोळक्याने मारहाण करत फरफटत नेत अपहरण केल्याचा व्हिडिओ आज सकाळी सोशल मिडीयावर व्हायरल झाला अन् पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडाली.
सदरची घटना घडल्यानंतर नन्नवरे यांच्या पत्नी दिया नन्नवरे यांनी तात्काळ बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन व्यक्तींसह अन्य अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असतांना हे आरोपी भूम तालुक्यात असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर अंबी पोलीस ठाणे हद्दीत आज पहाटे दहा जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एक महिलेचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप हल्ल्याची नेमकी कारणे स्पष्ट झालेली नाहीत. गोरे वस्ती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक या घटनेमुळे घाबरले आहेत.








