
बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण
बीड-अहिल्यानगर रेल्वेला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा

बीड (रिपोर्टर): बीडकरांचे गेल्या कित्येक वर्षांचे स्वप्न अखेर आज प्रत्यक्षात उतरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड-अहिल्यानगर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आज सकाळपासून बीडच्या रेल्वेस्थानकावर हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. सकाळीच रेल्वे रुळावर येऊन थांबली होती. या वेळी मान्यवरांसोबत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, खा. बजरंग सोनवणे हे उपस्थित होते.
विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे मुख्यमंत्र्यांसमवेत थेट बीडच्या रेल्वेस्थानकावर गेले. गेल्या 50 वर्षांपासून बीडकरांनी जे रेल्वेचे स्वप्न पाहिले होते ते आज प्रत्यक्षात साकार झाले. हजारोंच्या संख्येने बीडकर रेल्वेसेवा सुरु होत आहे, तो क्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी स्थानकात उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड-अहिल्यानगर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.








