
दिव्यांग महिलेचे घर कोसळून संसार उध्वस्त
गेवराई (रिपोर्टर): सतत पडत असलेल्या पावसामुळे गेवराई शहरातील बोर्डे गल्ली येथे दुर्दैवी घटना घडली आहे. दिव्यांग महिला सुनिता भुते यांच्या गरीब कुटुंबाचे घर दि. 26 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण कोसळले. या दुर्घटनेत संसारोपयोगी सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली असली तरी अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. ना तलाठी, ना मंडळाधिकारी, ना नगरपरिषद कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.एकीकडे शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देत असले तरी शहरातच घडलेल्या या घटनेबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जर शहरातील घटनेकडे असे दुर्लक्ष होत असेल तर ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्तांना मदत मिळणे किती अवघड आहे याचा प्रश्न उपस्थित होत आहे.







