
दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, दोघे काय बोलणार, राज्याचे लक्ष!
शिवणी येथे धम्मपरिषदेची तयारीही अंतिम टप्प्यात
बीड (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यातल्या दोन प्रमुख गडांवरून उद्या विचाराचं सोनं लुटलं जाणार असून नारायणगडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत तर तिकडे भगवान भक्तीगडावर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. इकडे बीडपासून काही अंतरावर असलेल्या शिवणी येथे अकिल भारतीय सहावी बौद्ध धम्म परिषद उद्या होत असून या परिषदेची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या जिल्ह्यात दसर्या निमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. प्रामुख्याने भगवान भक्तीगड व नारायणगड येथील दोन्हीही मेळाव्यांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्रामध्ये दसरा मेळाव्याला गेल्या कित्येक वर्षापासून मोठे महत्व आहे. बीड जिल्ह्यातही गेल्या दोन दशकांपासून दसरा मेळावे होत आहेत. यावर्षी या मेळाव्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट असले तरी दसरा मेळाव्याची उत्सुकता कायम आहे. नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी न भूतो ना भविष्यती असा दसरा मेळावा झाला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मराठा समाज डेरेदाखल झाला होता. यावर्षीही नारायणगडावर दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या संभाजीनगरहून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे येतील आणि तेथून ते बीडमार्गे नारायणगडावर जातील. त्याठिकाणी नगदनारायण महाराजांचे दर्शन घेऊन जरांगे पाटील हे व्यासपीठावरून उपस्थित समुदायाला संबोधित करतील.
दुसरीकडे सावरगाव येथे संत भगवानबाबा यांच्या जन्मभूमीत म्हणजेच भगवान भक्तीगडावर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होत असून या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या दोन्ही मेळाव्यांकडे जिल्ह्याचेच नव्हेतर राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. तिकडे बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवणी या ठिकाणी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद होत असून यावर्षी ही सहावी धम्मपरिषद आहे. त्याठिकाणीही कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे. या उपरांत बीड जिल्ह्यात विजयादशमीच्या अनुषंगाने विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल जिल्ह्यात पहायला मिळणार आहे.








