
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण – मैदानावर खड्डे व चिखलामुळे खेळाडू व नागरिक त्रस्त.
बीड, (रिपोर्टर)ः- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण हे खेळाडू, तरुण तसेच नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानले जाते. मात्र सध्या या मैदानाची प्रचंड दुर्दशा झाली असून, मैदानावर फिरणार्या नागरिकांना व खेळाडूंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मैदानाची दुरदशा पाहता मैदान आहे की जंगल असा प्रश्न उपस्थित होत असून नगर पालिकेने सदरचे मैदान तात्काळ दुरूस्त करावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे

दररोज सकाळी शहरातील अबालवृद्ध नागरिक वॉकिंगसाठी या मैदानावर हजेरी लावतात. पण आज या मैदानाची अशी अवस्था झाली आहे की जंगलातला रस्ता बरा अशी हाकारे नागरिकांकडून उमटत आहेत. मैदानभर मोठमोठे खड्डे, काही ठिकाणी चिखल, तर गवतामध्ये जनावरे मुक्तपणे चरतात. अशा अवस्थेमुळे वृद्ध नागरिकांना चालताना पडून जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.याच मैदानावर फुटबॉल आणि इतर खेळ खेळण्यासाठी येणारे तरुण व शाळकरी मुले देखील त्रस्त झाले आहेत. खेळ खेळणे तर दूरच, पण मैदानावर धावणे सुध्दा अवघड झाले आहे.
दरम्यान, नागरिकांनी नगरपालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामते, नगरपालिका या मैदानाचा वापर धंदेवाईकपणे करते. विविध खासगी व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदान भाड्याने दिले जाते, पण त्याची देखभाल व दुरुस्ती मात्र केली जात नाही.स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, नगरपालिका जर महसूल मिळवत असेल, तर त्यातून मैदानाची योग्य देखभाल का केली जात नाही?
्रकाही वृद्धांनी सांगितले की, दररोज फिरायला जाताना धोक्याची भावना असते. कधी पडतो की काय अशी भीती वाटते. प्रशासनाने तात्काळ मैदान व्यवस्थित करून दिले पाहिजे.
क्रीडाप्रेमी तरुणांनीही रोष व्यक्त केला असून त्यांनी स्पष्ट सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण हे बीडची ओळख आहे. पण सध्या ते जंगलासारखे व ओसाड बनले आहे. जर तातडीने लक्ष दिले नाही तर मोठे आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा बीडकरांनी दिला आहे






