
राज्यमंत्री बदामराव पंडित यांची भेट ; या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन
गेवराई (रिपोर्टर)ः- गेवराई तालुक्यातील औरंगपूर-कुकडा येथे शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी माती परिषदेच्या वतीने सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन दुसर्या दिवशीही तीव्रतेने सुरूच आहे. अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने धरणे स्थळी उपस्थित आहेत.
काल या आंदोलन स्थळी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी तहसीलदारांशी चर्चा करून मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्याशी थेट मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.या आंदोलनातील शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या : – पूरामुळे वाहून गेलेल्या जमिनींचे स्वतंत्र पंचनामे करून किमान 3 लाखांचे अनुदान द्यावे किंवा पेरणीयोग्य मातीचा भराव करावा., खरीप हंगामातील तूर, कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांना प्रत्येकी 1 लाखांची तात्काळ मदत द्यावी., शेतकर्यांचे पीककर्ज व तारण कर्ज माफ करून त्यांना कर्जमुक्त करावे., नवीन कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे., सोलर पंपांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळावी; वितरकांना तात्काळ दुरुस्तीच्या सूचना द्याव्यात, तसेच पैसे भरलेल्या शेतकर्यांना सोलर पंप वाटप करावे., बुजलेल्या विहिरी, बोअरवेल व मोटर जळाल्याचे पंचनामे करून अनुक्रमे 5 लाख, 50 हजार आणि 50 हजार इतके अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे., रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती पुनरुज्जीवनासाठी कामे सुरू करून शेतकर्यांना त्याचा लाभ द्यावा., फळबागधारकांना प्रति हेक्टर 2 लाखांचे सरसकट अनुदान द्यावे., खरीप हंगाम 2024-25 मधील फळबागांसह सर्व पिकांचा विमा मंजूर करून दिवाळीपूर्वी रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करावी.
या सर्व मागण्यांसाठी गेवराई तालुक्यातील शेतकरी एकजुटीने आंदोलनात सहभागी झाले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान आमदार विजयराजे पंडित यांनीही आंदोलकांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आणि आपल्या स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या आंदोलन स्थळी मनोज शेंबडे, रामेश्वर गाडे, अशोक हाटोटे, अशोक गाडे, दिगंबर आहेर, सुरेश नवले, अभिमान गाडे, शिवाजी गाडे, राजाभाऊ गाडे, विक्रम गाडे, संजय गाडे, लक्ष्मण आहेर, रघुनाथ नावडे, आबासाहेब आहेर यांसारखे अनेक शेतकरी व कार्यकर्ते ठामपणे आंदोलनात सहभागी आहेत.स्थानिक पातळीवर आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकर्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी उपस्थित नागरिक आणि शेतकर्यांकडून केली जात आहे.






