
सावरगाव घाट परिसरात 13 जणांवर गुन्हे
पाटोदा, (रिपोर्टर)ः- दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने मोटार सायकल रॅली काढलेल्या तरूणांकडे कुठलीही परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांना पार्किंगमध्ये गाड्या लावण्याचे सांगून मेळाव्यासाठी जा म्हंटल्यानंतर पोलिसांसोबत अरेरावीच्या भाषेत उध्दटपणा करणार्या आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कर्तव्यात अटकाव करत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून 13 जणांविरोधात अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ही सावरगाव घाट परिसरात घडली असून गुन्हा दाखल झालेल्या तरूणांमध्ये घोळवेवाडी येथील तरूणांचा समावेश आहे.
याबाबत अधिक असे की, दसर्या दिवशी सावरगाव घाट या ठिकाणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होता. या दसरा मेळाव्यासाठी घोळवेवाडी येथील महेश गोवर्धन सानप, मंजू सानप (रा.सौताडा), मधूकर दहिफळे, गणेश वारे, अक्षय दहिफळे, राहुल खेडकर, अविनाश वारे, ऋतीक दहिफळे, राजेश वारे, अमोल वारे ( सर्व रा.पांगरी) व आकाश दहिफळे, अनिल घोळवे (रा. घोळवेवाडी) हे सर्व जण या परिसरामध्ये मोटारसायकल रॅली काढून आले होते. सदरच्या रॅलीला परवानगी नव्हती. या वेळी पोलीस प्रशासनाने पुढे मेळावा आहे, तुम्ही तुमच्या गाड्या पार्किंगमध्ये लावा आणि पुढे जा असे म्हंटले, मात्र या वेळी उपस्थित पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या सोबत वरील लोकांनी अरवच्च भाषा वापरून ते करत असलेल्या कर्तव्यास अटकाव आणला. लोकसेवकाच्या आदेशाचे पालन केले नाही. जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस शिपाई शाम खाडे यांच्या फिर्यादीवरून 13 जणां विरोधात अंमळनेर पोलिसात गुन्हा रजि.नं. 183/25 कलम 221, 223, 189, (2), 190 भा.न्या.स. सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तेराही जण हे सौताडा, पांगरी आणि घोळवेवाडी येथील आहेत.





