
चालकाविरोधात अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल
अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः-छत्रपती संभाजी नगर येथील व्यापार्याने अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून एका ट्रकमध्ये हळद भरून सोलापुरला पाठविली होती. या ट्रकमध्ये 28 टन हळद होती. सदरील हळद चालकाने सोलापुरला न नेता इतर ठिकाणी लंपास केल्याचा प्रकार व्यापार्याच्या निदर्शनास आल्यानंतर सदरील व्यापार्याने याबाबत अंबाजोगाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चालकासह अन्य व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या ट्रकमध्ये अंदाजित 37 लाखांची हळद होती.
प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी (रा.छत्रपती संभाजीनगर) यांनी 30 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून ट्रक क्रं. एम.एच26 एडी 2935 यामध्ये 28 टन हळद भरून ती सोलापुरला पाठविली होती. हळदीचा ट्रक सोलापुरला गेलाच नाही. चालकाने इतर ठिकाणी हळद लंपास केल्याचे प्रितेश सोनी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चालक नदीम खान मुजाहेद खान (रा. अपना कॉर्नर, परभणी), सय्यद अजगर सय्यद सज्जान(रा. दंडी, परभणी) व इतर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ट्रकमध्ये जवळपास 30 किलो वजनाच्या 600 पोत्यामध्ये 39 लाख 76 हजार 700 रूपयांची हळद होती. चालकाने हळद नेमकी कोठे विकली, कोणाला दिली या प्रकरणाची अधिक चौकशी अंबाजोगाई पोलीस करत आहेत.





