
एक महिला ठार, चार जखमी । मानूरकर महाराजांची घटनास्थळी धाव
बीड (रिपोर्टर): शिरूर तालुक्यातील मानूर येथील नागनाथ देवस्थानच्या धार्मिक उत्सवासाठी निघालेल्या पायी दिंडीला आज (5 ऑक्टोबर) पहाटे भीषण अपघात झाला. रायमोहा गावाजवळ समोरून भरधाव वेगात येणारा छोटा टेम्पो थेट दिंडीमध्ये घुसल्याने सिंधू बबन घेवारे (रा. बीड) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
नागनाथ देवस्थान येथे 5 ऑक्टोबर रोजी होणार्या नऊ गन यात्रा उत्सवासाठी बीड येथून वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दिंडी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता माजलगावकर मठातून मार्गस्थ झाली होती. रायमोहा येथे मुक्कामी असलेली ही दिंडी आज पहाटे 4 वाजता मानूरकडे निघाली होती. रायमोहा गावाजवळ दिंडीमध्ये पिकअप (क्रमांक एमएच 12 सिटी 8588) घुसला. यात राजश्री (सिंधू) संतोष घेवारे (वय 42) या महिलेचा जागीच मृत्यु झाला असून अरुणा उमेश कळमकर (वय 36) रा. शनिवार पेठ, बीड, रुक्मीणी अमरनाथ कळमकर (वय 44) रा. शनिमंदिर गल्ली पेठ, बीड, सुमन सिद्धेश्वर चिपाडे (वय 39) रा. हिवरसिंगा ता. शिरूर कासार. जि. बीड, वैष्णवी पशुपती भुरे (वय 16) रा. कालिका नगर बीड या चार जखमी आहेत.अपघातानंतर दिंडीमधील युवकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. जखमींच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मानूरकर महाराजांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती समजताच मानूरकर महाराज तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची विचारपूस केली तसेच दिंडीतील भाविकांना धीर दिला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासन व स्वयंसेवकांना मदत करण्याचे आवाहन केले.
महाराजांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, संपूर्ण घटनेवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत.





