
नेकनूर पोलिसांची तरुणाला धमकी
नेकनूर (रिपोर्टर): शेतातून गेलेल्या उच्चदाबाच्या वीज वाहिनीबाबतचा मोबदला शेतकर्याला मिळाला नाही. त्यामुळे शेतातल्या टॉवरचे काम करू नका, असे सांगणार्या उपस्थित शेतकर्यांना नेकनूर पोलीस ठाण्याचा पोलीस थेट कॅरेक्टर खराब करून टाकण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. कायद्याचे रक्षकच गुंडांची भाषा बोलत असल्याने यावर संतप्त प्रतिक्रिया येत असून धमकी देणार्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
याबाबत अधिक असे की, कानडी घाट येथील काही शेतकर्यांच्या शेतातून उच्च दाबाची वीज वाहिनी गेली आहे.त यासाठी उभा करण्यात आलेल्या टॉवरचा मोबदला संबंधित शेतकर्याला मिळालेला नाही त्यामुळे त्या टॉवरचे जे काम चालू होते ते काम करू नका, असं उपस्थित शेतकरी सांगत होते. मात्र पोलिसांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी काम चालू होते. त्याच वेळी गणेश ग्यानबा झोडगे हा तरुण त्याठिकाणी आला काम बंद करण्याबाबत तोही शेतकर्यांसमवेत होता. या वेळी पोलीस आणि शेतकर्यात वाद सुरू झाला. त्यावेळी पोलिसांनी अरेरावीची भाषा सुरु केली. दत्तात्रय बळवंते यांनी मी युपीएससीची मेन्स दिली आहे, नीट बोला, असे म्हटले, त्या वेळी बळवंते नावाचा कॉन्स्टेबल ए शहाण्या सातबारा दाखव, तुझं शेत आहे का? तुझं कॅरेक्टर खराब करून टाकीन अशी धमकी देताना व्हिडिओमध्ये दिसून आला.
पोलिसाची भाषा एखाद्या गुंडाच्या भाषेसारखी होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत आम्ही नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्या शेतातील उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या टॉवरचे नटबोल्ट चोरीस गेले होते, तसा कॉल 112 वर आल्यानंतर आम्ही त्याठिकघाणी पोलीस पाठवले, त्यावेळी शेतकरी आणि पोलिसात बोलाबोली झाली. जो तरुण व्हिडिओमध्ये आहे त्याचं शेत त्याठिकाणी नाही, परंतु आमच्या पोलिसाकडूनही तेवढा एक चुकीचा शब्द गेला. असं त्यांनी म्हटले.








