
गोरगरीबांची खिदमत करणारे मौलाना अब्दुल बाखी यांचे निधन
आज सकाळी तकिया कब्रस्तानमध्ये झाला दफनविधी
बाखी यांच्या निधनाने शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्राची हानी
कोरोना काळात मोफत दवाखाने सुरू केले होते

बीड (रिपोर्टर): खिदमत-ए-खल्कच्या माध्यमातून हजारो गोरगरीबांना मदत करणारे व मुबल्लिगुल इस्लाम मदरसाचे संस्थापक हजरत मौलाना अब्दुल बाखी यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. आज सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान तकिया कब्रस्तान याठिकाणी त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. या वेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होती. त्यांच्या दफनविधीला बीड जिल्ह्यातूनच नव्हेतर विविध जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली.
मौलाना अब्दुल बाखी यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने यामध्ये त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे होते. त्यांनी खिदमत-ए-खल्कच्या माध्यमातून हजारो लोकांना मदतीचा आधार दिलेला आहे. मुबल्लिकुल इस्लाम मदरसाची उभारणी करून समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी अन्नछत्र चालवून ईद, सणोत्सवाच्या वेळी संसारोपयोगी साहित्याचे वाटप केलेले आहे. त्यांचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरुच होते. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांनाही त्यांनी वेळोवेळी मदत केली. गरजू, गोरगरीब अणि विधवा महिलांना शिलाई मशीन, मिर्ची कांडप यंत्र सह इतर साहित्याचे वाटप त्यांनी केले. त्यांच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी 10 वाजता मुबल्लिगुल इस्लाम मदरसा समोर जनाजा नमाज झाली. त्यानंतर तकिया मस्जिद कब्रस्तान या ठिकाणी त्यांचा दफनविधी करण्यात आला. या वेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होती. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.








