
एसटीत सामावून घेतले जात नसल्याची लिहिली चिठ्ठी
शासनाने आतातरी डोळे उघडावेत, धनगर समाजाला एसटीत सामावून घ्यावे, योगेशचे बलिदान व्यर्थ जाणार नाही -भारत सोन्नर

मादळमोही (रिपोर्टर): धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून अखंड समाज हा शासन दरबारी लढा लढत आहे, मात्र याकडे शासनाचे पुर्णत: दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजातील बांधवांचा आता धीर सुटताना दिसून येत आहे. आज एका 33 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्याने त्याच्या खिशात चार ओळीची चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये मी योगेश बबन चौरे धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. असा स्पष्ट उल्लेख त्या चिठ्ठीत आहे. त्याचा पार्थीव सध्या मादळमोहीच्या रुग्णालयात असून घटनास्थळावर पोलिसांसह प्रशासनाचे अन्य अधिकारी आले आहेत. या घटनेने समाज बांधवात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, सरकारला याची किंमत चुकवावी लागेल, असं म्हणत आतातरी सरकारने डोळे उघडावे आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घ्यावे.

मादळमोही येथील योगेश बबन चौरे हा 33 वर्षीय तरुण हॉटेल व्यवसाय करत आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत असे. गेल्या काही दिवसांपासून तो धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यातही सक्रिय पहावयास मिळत होता. आज पहाटेच्या दरम्यान योगेशने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यात मी योगेश बबन चौरे धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे त्याने लिहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस डेरेदाखल झाली आहे. अन्य अधिकारीही घटनास्थळी असून दुपारी एक वाजेपर्यंत योगेशच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार झालेले नव्हते. याची माहिती यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांना झाल्यानंतर त्यांनी मादळमोही येथे जात कुटुंबियांची भेट घेतली. गेल्या 20 वर्षांपासून आपण धनगर समाजाला एसटीमध्ये सामावून घ्यावे यासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून लढा देत आहोत, समाज बांधव या लढ्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सक्रिय आहेत. मात्र शासन या महत्वाच्या आणि न्यायिक मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. आज समाजातील योगेश याने आत्महत्या केली आहे, त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्याचा हिशोब सरकारकडून घेतला जाईल, असं म्हणत भारत सोन्नर यांनी धनगर समाजाच्या भावना लक्षात घेऊन एसटीमध्ये समावेश करावा, नसता पुढचा लढा हा तीव्र स्वरुपाचा असेल असा इशाराही त्यांनी दिला.








