
कापूस विक्रीसाठी पाच लाख शेतकर्यांच्या नोंदी
बीड, (रिपोर्टर)ः- केंद्र सरकारने या वर्षी कापसाला हमीभाव 8810 रूपये जाहिर केला. हमीभाव केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी शेतकर्यांना नोंदणी करण्याची आवश्यकता असल्याने राज्यभरातील पाच लाख शेतकर्यांनी कापूस किसान अॅपवर नोंदणी केलेली आहे. शासनाचा भाव 8810 असला तरीखाजगी व्यापारी मात्र 7 हजार रूपयांनुसार कापसाची खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने कापसाचे उत्पादन घटणार आहे.
केंद्र सरकार दरवर्षी कापसाचा हमीभाव जाहिर करतं. वाढत्या महागाईनुसार कापसाला यंदा कमीच भाव आहे. केंद्राने 8810 रूपये हमीभाव जाहिर केला. खाजगी व्यापारी मात्र 7 हजार ते 7500 या दरम्यान कापसाची खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. हमीभावानुसार कापूस विकण्यासाठी शेतकर्यांना आधी नोंद करावी लागलेली आहे. राज्यात पाच लाख शेतकर्यांनी कापूस किसान अॅपच्या माध्यमातून नोंदणी केलेली आहे. राज्यात अजुनतरी हमीभावाचे केंद्र सुरू झालेली नाही. सीसीआय राज्यात 150 हमीभाव केंद्र सुरू करणार असून त्यातील 20 ते 22 केंद्र हे पनन महासंघाचे असणार आहेत.
हमीभाव केंद्र नेमकं कधी सुरू होणार?
कापसाची वेचणी सुरू आहे काही शेतकर्यांच्या दोन तर काहींच्या तीन वेचण्या झालेल्या आहेत. गरजेपोटी शेतकरी खाजगी व्यापार्यांना कापूस विक्री करत आहेत. मात्र खाजगी व्यापारी कमी भावाने कापसाची खरेंदी करून शेतकर्याची लुट करत आहेत. हमीभावाचे केंद्र दिवाळीच्या दरम्यान सुरू झाले असते तर नक्कीच शेतकर्यांचा फायदा झाला असता. अजुन तरी एकही केंद्र राज्यात सुरू झालेली नाहीत. 50 टक्के कापूस खाजगी व्यापार्यांनी खरेदी केल्यानंतर हमीभाव केंद्र सुरू होणार की काय? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.








