
निवडणूक आयोगाकडून आराखडा तयार; स्थानिक स्वराज्याच्या दोन टप्प्यात निवडणुका
मुंबई (रिपोर्टर): राज्यभरात स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून पाच ते सात वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अधिक जवळ आला असून येत्या आठ दिवसात नगरपालिका निवडणुकीबाबत आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असून निवडणूक आयोगाने तसा आराखडा तयार केला आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक घोषणा हिवाळी अधिवेशनात अथवा अधिवेशनानंतर होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गेल्या पाच ते सात वर्षांपासून महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 च्या आत निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाला आदेशीत केल्यानंतर आता निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. त्यामुळे राज्यभरात स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आहे. आयोगाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात संभाव्य निवडणूक तारीख येण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आयोगाने दोन टप्प्यात निवडणुका घेण्याचे ठरवले असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि दुसर्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होऊ शकतात. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना अथवा अधिवेशनानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या हालचाली पाहता पक्षीय पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. इच्छूक आपआपल्या मतदारसंघात चाचपणी करत आहेत तर शहरी भागात वार्डा वार्डात इच्छुकांची बहुगर्दी दिसून येत आहे.








