फलटण उपजिल्हा रुग्णालयातील
ऑनलाईन रिपोर्टर
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले असून, 2012 बॅचच्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. या एसआयटीला तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तेजस्वी सातपुते या पूर्वी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. कठीण आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी यशस्वी तपास केलेला अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.
एसआयटी चौकशीची मागणी मान्य
या प्रकरणात काही राजकीय नावांचा संबंध असल्याचे बोलले जात होते. पोलिसांवर दबाव येऊ शकतो, तपास निष्पक्ष होणार नाही, अशी विरोधकांची भूमिका होती. त्यामुळेच एसआयटी चौकशीची मागणी जोर धरत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य करत स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती केली.
आत्महत्येची धक्कादायक घटना
23 ऑक्टोबर रोजी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने हातावरच आत्महत्येची नोंद (सुसाईड नोट) लिहिली होती. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीदरम्यान अनेक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना फलटण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी एसआयटीचा तपास किती प्रभावी ठरतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.










