
केंद्राचं पथक आलं, उध्वस्त शेती, पडलेले घर, खराब झालेले रस्ते पाहितले
बीड, (रिपोर्टर)ः-संवेदनशिलता हरलेल्या राज्य सरकारसह केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्याची पुर्ती थट्टा करण्याचे ठरवले की काय? असा जळजळीत सवाल उपस्थित करावासा वाटतो. काल सोलापुरातील एका खेड्या गावात रात्री केंद्राच्या पथकाने टॉर्चने पाहणी केली आणि शेतकर्यांच्या जखमांवर अक्षरशः खडे मीठ चोळले. सुर्देव बीड जिल्हावासियांचं केंद्राचं पथक बीडमध्ये रात्री मुक्कामी आलं आणि आज सकाळी या पथकाने बीड तालुक्यातील लिंबारूई, शिरूर तालुक्यातील येवलवाडी, कारेगाव येथील शेती नुकसानीबरोबर रस्ते, बंधारे, एमएससीबी यासह अन्य गोष्टींची पाहणी केली. संवेदनशिलता हरवलेले म्हणून आम्ही जो शब्द प्रयेाग करतोय तो केवळ आणि केवळ गेल्या महिनाभरापुर्वी अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील शेतकर्याला उध्वस्त केलं शेती उखडून गेली, पिके जमिनदोस्त झाले, जनावरे अक्षरश पाण्यात वाहुन गेले. त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी आकसाबोक्स रडत होता. ते पहायला केंद्र सरकारचं पथक आलं नाही. आता उशीरा का होईना हे पथक आलं आहे. त्या पथकाने शेतकर्यांची वस्तूस्थिती केंद्र सरकारला सांगावी अन् उशीरा का होईना शेतकर्यांना मदत द्यावी.
बीड जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात धो-धो पाऊस पडून शेतकर्यांच्या जमीनही खरडून गेल्या, पिके नाहीशी झाली, जवळपास एक हजारांच्या आसपास पशुधनाचेही नुकसान झाले. अविृष्टीग्रस्त शेतकर्यांना राष्ट्रीय आपत्ती धोरणाच्या निकषानुसार राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक काल पासून छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाच्या दौर्यावर असून रात्री हे पथक मुक्कामी बीड येथे आल्यानंतर आज सकाळी या पथकाने दुपारी 12 च्या दरम्यान बीड तालुक्यातील लिंबारूई, शिरूर तालुक्यातील येवलवाडी, कारेगाव येथील खरडून गेलेल्या शेतीची, नुकसान ग्रस्त शेत पिकांची, बंधारे, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहुन गेलेले रस्ते, तुटलेले पुल आणि एमएससीबीच्या पडलेल्या पोलांची पाहणी करून हे पथक पाटोदा तालुक्याकडे नुकसानग्रस्त शेतपिकांच्या नुकसानीसाठी रवाना झाले.
राष्ट्रीय आपत्ती धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करावी असा प्रस्ताव केंद्र सरकारला गेल्यानंतर आपत्ती निवारण धोरणानुसार राज्य सरकारला मदत करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक पाहणी करते. या पथकाच्या पाहणी दौर्याच्या अहवालानंतरच राज्य सरकारला केेंद्राकडून मदत प्राप्त होत असते त्या अनुषंगाने बीड येथे काल केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचे सहसचिव आर.के. पांडे यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथक बीड मुक्कामी आले. यामध्ये डॉ.एस.व्ही.एस.पी. शर्मा आणि विलास पांडे हे दोन सदस्य ही आहेत. त्यांनी आज सकाळी लिंबारूई, शिरूर तालुक्यातील येवलवाडी, कारेगाव या ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव, तहसिलदार चंद्रकांत शेळके हे होते. या पथकाने लिंबारूई येथील वाहुन गेलेला बंधारा, खरडून गेलेली शेती, वड्या नाल्यांचे तुटलेले बांध, घरांची झालेली पडझड बघितली. या ठिकाणी काही उपस्थित असलेल्या शेतकर्यांसोबत संवादही साधला त्यांच्या व्यथा ही ऐकल्या त्यानंतर त्यांनी शिरूर तालुक्यातील येवलवाडी आणि कारेगाव या ठिकाणी ही भेटी देवून नुकसानग्रस्त शेतीची, बंधार्याची, एमएससीबीच्या पडलेल्या खांबाची पाहणी केली. तत्पुर्वी जिल्हा प्रशासनाने या पथकासमोर नुकसानग्रस्त शेतीसह इतर सर्व बाबींचा अहवालाचे सादरीकरण केले होते. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सुमारे 7 लाख 13 हजार हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये 8 लाख 6 हजार शेतकर्यांचे नुकसान आहे. तर जवळपास 7 हजार 472 सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झालेले आहे. हे पथक पाटोदा आणि आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करून पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पथकाला जिल्हा प्रशासनाने सर्व नुकसानीचा अहवाल ही दिलेला आहे.
शेतकर्याच्य खात्यात मदतीला सुरूवात
केंद्र शासनाचे पथक येवून पाहणी करून जाण्यापुर्वीच राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती धोरणानुसार 18 हजार 500 एवढी हेक्टरी मदत घोषीत करून बीड जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 577 कोटी एवढी रक्कम देण्यात आली होती तर रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10 हजार या प्रमाणे 508 कोटी या प्रमाणे ही रक्कम बीड जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. यातील काही मदत ही शेतकर्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष वर्ग झाली असुन अनेक शेतकर्यांच्या खात्यावर अद्याप मदत मिळालेली नाही. ही मदत फार्मर आयडी आणि ई केवायसी केल्यानंतर मिळेल.





