
धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
जाहिरात स्थगित करा, नव्याने जाहिरात काढण्याची मागणी
मुंबई (रिपोर्टर): सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) 1974 पदे आणि वैद्यकीय अधिकारी (गट-अ) 1440 पदे या भरती जाहिरातींवरून मोठा वाद उभा राहिला आहे. दोन्ही जाहिरातींत एन.टी. आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकही जागा न राखल्याने राज्यभरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याची गंभीर दखल घेत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत आक्षेप नोंदवून सदरची जाहिरात स्थगित करून कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही अशी जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली.
समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या जाहिरातीत एनटी-डी प्रवर्गाला एकही जागा नाही, तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या जाहिरातीत एनटी अ, ब, क, ड – सर्वच उपप्रवर्गांसाठी शून्य जागा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून राज्यभर असंतोष उसळला आहे.ही बाब लक्षात घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची हमी देण्यासाठी दोन्हीही जाहिराती तात्काळ स्थगित कराव्यात आणि आरक्षणाचा नियम पाळून नवीन, सर्वसमावेशक जाहिरात काढावी. राज्यातील एनटी प्रवर्गातील हजारो विद्यार्थी या पदांसाठी दीर्घकाळ तयारी करत असताना अचानक आरक्षण शून्यावर गेल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे. आता सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





