घेतली फाशी
वडवणीच्या हरिश्चंद्र पिंप्रीत हृदयद्रावक घटना
माजलगाव (रिपोर्टर): मुख्यमंत्री साहेब, शेतीमालाला भाव नाही, बँकेच्या कर्जाचा बोजा आहे, या सर्व त्रासाला कंटाळून माझं जिवन स्वत: फाशी घेऊन संपवत आहे. अशा आशयाची चार ओळीची सुसाईड नोट लिहित 28 वर्षीय तरुण माळकरी शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्रपिंप्री येथे उघडकीस आल्याने सर्व हळहळ व्यक्त होत आहे. रात्री हा तरुण शेतात झोपण्यासाठी गेला, आज सकाळी दूध आणि वडिलास त्याने घरी आणून सोडलं, नंतर तो शेतात गेला. तर त्याचा मृतदेहच घरच्यांना दिसला. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिकस्थिती हलाखीची यातून तरुण शेतकरी आत्महत्यासारखा मार्ग स्विकारत असल्याने बीड जिल्हा चिंताक्रांत झाला आहे.
याबाबत अधिक असे की, वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्रपिंप्री येथील 28 वर्षीय तरुण माळकरी शेतकर्याने मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहित आत्महत्या केली. हरिश्चंद्रपिंप्री येथील रामराव शिंदे या शेतकर्याला दोन मुले आणि एक मुलगी. रामराव यांच्या मोठ्या मुलीचा आणि मुलाचा विवाह झालेला. त्यांचा हा 28 वर्षीय गोविंद नावाचा मुलगा आणि रामराव रात्री शेतामध्ये झोपण्यासाठी गेले. आज सकाळी गोविंद याने दूध आणि वडिलांना मोटारसायकलवरून गावात आणून सोडले. पुन्हा गोविंद हा शेतात गेला. दहा – साडेदहाच्या दरम्यान त्याचा मृतदेह एका झाडाला लटकताना काहींनी पाहिल्यानंतर तात्काळ स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्याच्या जवळ एक चिठ्ठी आढळून आली. अवघ्या चार ओळी गोविंद याने लिहिले आहेत. मात्र त्या वस्तूस्थिती ओरडून सांगतात. त्याच्या शेतातील सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले आहेत. चिठ्ठीमध्ये गोविंद म्हणतो, मुख्यमंत्री साहेब, मी गोविंद रामराव शिंदे अनुदान मिळालं नाही, व शेतमालाला भाव नाही, बँकेच्या कर्जाचा बोजा आहे. या त्रासाला कंटाळून माझं जिवन स्वत: फाशी घेऊन संपवत आहे. त्याची ही चार ओळीची चिठ्ठी उभ्या बीड जिल्ह्यातल्या नव्हे तर राज्यातल्या शेतकर्यांची वस्तूस्थिती ओरडून सांगते. गोविंद शिंदे यांच्या परिवाराकडे बँकेसह अन्य काही कर्ज असल्याचे सांगितले जाते. या आत्महत्येने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुण शेतकरी आत्महत्या करतायत याची चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.







