—————
गेवराई :(रिपोर्टर) गेवराई शहरातील नागरिकांचे आणि पवार कुटुंबाचे गेल्या तीन पिढ्यांपासून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार गिताभाभी पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. गेवराई च्या जनतेने माजी मंत्री बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेची सत्ता द्यावी, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.
रविवार दि. 16 रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आमदार सुरेश धस यांनी गेवराई शहरात येऊन भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घेतला. माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांच्या निवासस्थानी आ. धस यांनी भेट देऊन नगर परिषदेचे उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकार्यांशी चर्चा केली. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की गेवराईची नगरपरिषद ही गेलात अनेक वर्षांपासून पवार घराण्याकडे आहे म्हणूनच आज या गेवराई शहराच्या नगरपरिषदेचा राज्यात नावलौकिक आहे. यापुढे येणारी सत्ता ही भाजपच्या ताब्यात येईल असा विश्वास व्यक्त करत पुढील काळातही गेवराई नगरपरिषदेला हवा तेवढा निधी देऊ असा शब्द आ.सुरेश धस यांनी गेवराई कारांना दिला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.














