गेवराई (रिपोर्टर): गेवराई नगरपरिषद निवडणुकीची हवा जोर धरत असताना राष्ट्रवादीच्या गटात उमेदवारी वाटपावरून असंतोष उसळल्याचे चित्र दिसत आहे. नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागात ऐनवेळी ‘आयात’ उमेदवारांना संधी दिल्यामुळे जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. या असंतोषाचा थेट फटका राष्ट्रवादीला बसू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
गेवराई नागरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर भाजपाच्या सौ. गीताभाभी बाळराजे (त्रिंबक) पवार आणि राष्ट्रवादीच्या सौ. शितलताई महेश दाभाडे यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही गटांकडून नियोजनबद्ध रणनीती आखण्यात आली असली तरी राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी प्रक्रियेत झालेल्या कथित अन्यायामुळे अंतर्गत अस्वस्थता वाढलेली दिसत आहे.
सौ.शितलताई दाभाडे यांच्या ऐनवेळी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले. कारण त्यांचे पती माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे हे यापूर्वी भाजप नेते माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या गटाचे प्रमुख शिलेदार समजले जात होते. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी आमदारकीची चाचपणी केली होती, परंतु कोणत्याही पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत शांततेची भूमिका घेतली होती. नंतरच्या काळात त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि काही महिन्यांतच त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली.
दुसरीकडे, राष्ट्रवादीत अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे निष्ठेने काम करत असल्याने त्यांना उमेदवारीची नैसर्गिक अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी बाहेरून आलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली. केवळ नगराध्यक्ष पदावरच नव्हे तर विविध प्रभागांतही निष्ठावंतांची उपेक्षा करून नव्याने प्रवेश घेतलेल्या अनेकांना तिकिटे देण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आसून या नाराजीचा निवडणूक निकालावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.














