बीड : सतीश गायकवाड
मायबा देवस्थान मच्छिंद्रनाथगड (ता. सावरगाव) येथील यात्रेदरम्यान चोरीस गेलेली सोन्याची चैन चोरी करणाऱ्या आरोपीस बीड स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मालाविरुद्ध दाखल गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या स्पष्ट सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
दि. 19 डिसेंबर 2025 रोजी मच्छिंद्रनाथगड येथे भरलेल्या यात्रेदरम्यान एका इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 419/2025, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम सोन्याची चैन विक्रीसाठी बीड शहरात आला आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने च-हाटा फाटा, बीड येथे सापळा रचला.
दि. 01 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता संशयित इसम सुधीर रावसाहेब कराळे (रा. धामनगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली सोन्याची चैन जप्त करण्यात आली. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी अंभोरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड, तसेच पोह/अशोक दुबाले, पोह/सोमनाथ गायकवाड, पोह/बाळू सानप व चापोअ/सिद्धेश्वर मांजरे यांनी केली.








