बीड (रिपोर्टर): बीडची बारामती करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, ती इच्छाशक्ती माझ्याकडे आहे, असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकत्व स्विकारून बीडच्या विकासाचा पाया रचणारे दिवगंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती अकाली दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर अजितदादांचा अस्थिकलश आज दर्शनासाठी बीडच्या राष्ट्रवादी भवनात ठेवण्यात आला. या वेळी दादांच्या चाहत्यांनी त्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले. या वेळी आ. विजयसिंह पंडित यांनी अजितदादा यांचे बीडमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून स्मारक उभारणार असल्याचे सांगून पुर्णाकृती पुतळा तिथे उभारला जाईल, असे म्हटले.
बीड येथील राष्ट्रवादी भवनात सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत स्व. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल होता. या वेळी अनेकांनी मोठी गर्दी करत त्याठिकाणी अस्थिकलशाचे दर्शन घेत अजितदादांना अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, कल्याण आखाडे, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्यासह आदी मान्यवरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या अस्थिकलशाचे विधिवत गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शनिचे येथील गोदावरी नदीपात्रात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आ. विजयसिंह पंडित यांनी अजितदादा यांचे स्मारक बीडमध्ये उभारणार असल्याचे सांगितले. त्याठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले. हे स्मारक कुठे उभारायचे याबाबत लवकरच जागा निश्चित केली जाईल, असेही आ. पंडित यांनी म्हटले. बीडची बारामती करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे ती इच्छा शक्ती माझ्याकडे आहे, असे अजितदादांनी म्हटले होते मात्र दुर्दैवाने त्यांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाला. दादांची ही जबाबदारी आता त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी घेतली असून त्यांच्याकडे बीडचे पालकत्व आले आहे.







