गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील नागझरी शिवारात महसूल पथक व वाळू तस्कर यांच्यात मध्यरात्री झालेल्या कथित झटापटीने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेमागे केवळ अवैध वाळू उपसा रोखण्याची कारवाई नसून वसुलीवरून वाद झाला का? अशी जोरदार कुजबुज आता परिसरात सुरू झाली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील नागझरी, खामगाव परिसरात रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास महसूल पथक दाखल झाले. त्या ठिकाणी वाळू भरत असलेल्या हायवावर कारवाई करण्यात येत असताना पथकातील मंडळाधिकारी बाबा बडे आणि संबंधित वाळू तस्कर यांच्यात तीव्र वाद झाला. काही वेळातच हा वाद हाणामारीत परिवर्तित झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू असल्याचे सांगितले जाते. या झटापटीत मंडळाधिकारी जखमी झाल्याची चर्चा असली तरी घटनेबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे एवढी गंभीर घटना घडूनही उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. परिसरात मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे. नागझरी परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला पूर्वीपासून होती, तरीही कारवाई वेळोवेळी का झाली नाही? अचानक मध्यरात्रीच छापा का? आणि त्यातूनच वसुलीवरून वाद निर्माण झाला का? असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा मंडळाधिकारी व वाळू माफिया यांच्यातील हा कथित ‘फाईट’ प्रकार प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरू शकतो. दरम्यान, संबंधित मंडळाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे या प्रकरणामागील सत्य काय, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.








