परळी (प्रतिनिधी) – परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नाव लाच प्रकरणात समोर आल्याने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सालंसी (ऐपत्त) प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत एसीबीने तात्काळ सापळा रचत कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तक्रारीनुसार, तहसीलदार मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ही रक्कम २० हजार रुपयांवर ठरल्याची माहिती पुढे आली आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने प्राथमिक पडताळणी करून नियोजनबद्ध सापळा रचला. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. तरीदेखील एसीबीने आवश्यक पुरावे संकलित केले असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, या कारवाईमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हाभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, भ्रष्टाचाराविरोधातील या धडक कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवण्यासाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







