बीड | ऑनलाईन रिपोर्टर:
परळी शहर परिसरात घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी प्रभावी कारवाई करत एका विधीसंघर्ष बालकाकडून तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.
परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नं. 18/2026 कलम 303(2) भा.न्या.सं. अंतर्गत दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरीचा गुन्हा एका विधीसंघर्ष बालकाने केला आहे. त्यानुसार पथकाने संबंधित बालकाच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला असता तो ताब्यात मिळून आला.
चौकशीदरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यातील एक दुचाकी तसेच इतर दोन अशा एकूण तीन दुचाकी आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता संबंधित बालकाने परळी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तीनही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक स्कुटी व दोन मोटारसायकली असा एकूण तीन दुचाकी जप्त करून पुढील तपासासाठी परळी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत.
जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची पोलीस अभिलेखाशी पडताळणी केली असता खालील गुन्हे उघडकीस आले —
परळी शहर पोलीस स्टेशन गु.र.क्र. 18/2026 कलम 303(2) बीएनएस
संभाजीनगर पोलीस ठाणे गु.र.क्र. 69/2026 कलम 303(2) बीएनएस
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके (अंबाजोगाई) व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोउपनि सुशांत सुतळे, विष्णु सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे, मारोती कांबळे, दिलीप गिते व विकास राठोड यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परळी परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्यास मदत झाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.









