जालना | ऑनलाईन रिपोर्टर:
समृद्धी महामार्गावर आज (सायंकाळी) सुमारे ६ वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यातील जामनेर-कडवंची शिवारात घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भरधाव ट्रकची जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करणारे कामगार काम आटोपल्यानंतर त्यांच्या वाहनात बसले होते. त्यावेळी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या या वाहनाला मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कामगारांच्या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांचे तातडीने बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनातील अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
महिनाभरात दुसरी मोठी दुर्घटना
विशेष म्हणजे, ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडजवळ अशाच प्रकारच्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. महिनाभराच्या आत घडलेली ही दुसरी गंभीर घटना असल्याने समृद्धी महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे ओव्हरस्पीड वाहनांवर नियंत्रण व कामगारांसाठी कडक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.









