बीड (रिपोर्टर): बीड शहरातील नगर रोड परिसरात आज (बुधवार, 8 एप्रिल) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय (वय 42) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या या अचानक जाण्याने पोलीस दलासह बीड जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण जायेभाय हे बीडमधील नगर रोडवरील समर्थ मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या लोकाशा नगर परिसरात वास्तव्यास होते. आज सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. जायेभाय यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
बाळकृष्ण जायेभाय यांची ओळख पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून होती. यापूर्वी त्यांनी बीड स्थानिक गुन्हे शाखा (ङउइ) आणि गेवराई पोलीस ठाण्यात उल्लेखनीय सेवा बजावली होती. सर्वांशी प्रेमाने वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलातील त्यांच्या सहकार्यांनी आणि मित्रपरिवाराने मोठा धक्का बसला आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून, आत्महत्येमागचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









