बीड (रिपोर्टर) ज्या व्यक्तींना हक्काचा निवारा नाही त्यांना पंतप्रधान आवास, रमाई घरकुल योजनेअंतर्गत घर दिले जात आहे. असे असतानाही अनेक लोक घरकुलापासून वंचित राहत आहेत. त्यामध्ये बांधकाम मजुरांची संख्या मोठी आहे. ज्या बांधकाम मजुरांची नोंदणी आहे त्यांना अटल योजनेअंतर्गत घरकुल देण्यात येणार. घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
2024 पर्यंत सर्वांना घरकुल देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिलेले आहे. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात हजारो घरकुलांना मंजुरी दिली जाते. पंतप्रधान आवास आणि रमाई योजनेअंतर्गत घरकुलाचे वाटप होत आहे. असे असतानाही अनेक वंचितांना अद्यापही घरकुल मिळालेले नाही. देशभरात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मजुरांसाठी स्पेशल अटल घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. बांधकाम मजुरांची नोंदणी कामगार कल्याण कार्यालयामध्ये दरवर्षी केली जाते. ज्या मजुरांची नोंदणी आहे अशांना अटल घरकुल योजनेतून घर देण्यात येणार आहे. यासाठी सदरील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावयाचा आहे. आजपर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ न घेणार्या मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.
खर्या लाभार्थ्यांना ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र द्यावे बांधकाम मजुरांना आपली नोंदणी करण्यासाठी त्या त्या ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र लागते. मात्र अनेक ग्रामसेवक मजुरांना प्रमाणपत्र देत नसल्याचे समोर आले आहे. जे खरे मजूर आहेत त्यांना ग्रामसेवकाने प्रमाणपत्र द्यावे, जेणेकरून त्यांना घरकुलाचा लाभ घेत येईल.