भूमाफियांना लगाम घालण्यासाठी वक्फच्या जमीनी भाडे तत्वावर देणार -अध्यक्ष वजाहत मिर्झा
मॉल, शॉपींग मॉल, कॉम्प्लेक्स, रेसिडेन्सीचा डेमो प्रोजेक्ट नांदेडमध्ये; समिती गठीत -समीर काझी
बीड/औरंगाबाद (रिपोर्टर) राज्यभरात वक्फ बोर्डाच्या जमीनी मोठ्या प्रमाणावर असून व्यवस्थापनासाठी वक्फ बोर्डाचे सदस्य सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. बीड, उस्मानाबाद येथे वक्फ बोर्डाचे कार्यालय नव्हते. त्या कार्यालयाच्या उभारणीसाठी वक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांच्या प्रयत्नातून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून वक्फ बोर्डाच्या जमीनीवर इमारती उभा करून त्या रेंटवर देण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. त्याचा डेमो प्रोजेक्ट नांदेड येथे होणार आहे. त्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे 291 संस्थांच्या नोंदणीस मंजुरी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून प्रलंबीत मुतवल्लीच्या नेमणुकी व मंडळाच्या नियमित मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या नियुक्तीचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. भूमाफियांना लगाम लावून वक्फच्या जमीनी भाडे तत्वावर देऊन महसूल वाढीचा महत्वपुर्ण ठराव घेण्यात आला आहे.
मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे वक्फ बोर्डाची तीन दिवसीय बैठक झाली. या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, सदस्य खा. फौजिया खान, खा. इम्तियाज जलील, हाफिज सय्यद अथर अली, समीर काझी, हुसनैन शाकेर, एम.यू. पठाण, मुख्य जरियाकरी अधिकारी जुनैद सय्यद हे उपस्थित होते.
भूमाफियांच्या ताब्यात असलेल्या जमीनी हस्तगत करून त्या भाडे तत्वावर देतानाच मॉल, रेसिडेन्सी, कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत वक्फ बोर्डाने एक समिती स्थापन केली असून त्याचा डेमो प्रोजेक्ट हा नांदेड येथे होणार असल्याची माहिती बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी दिली. बीड आणि उस्मानाबाद याठिकाणी वक्फ बोर्डाचे कार्यालय नव्हते. या कार्यालयासाठी प्रत्येकी 20 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगत समीर काझी यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे बीड, उस्मानाबाद येथील वक्फ बोर्डाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे यावरून दिसून येते. आज पावेत वक्फ बोर्डासारख्या संस्थेचे कार्यालय बीड येथे नव्हते. मात्र ते कार्यालय आता होणार आहे. वक्फ बोर्डाच्या बैठकीत अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीत अनेक महत्वपुर्ण निर्णय झाले आहेत.