लातूरच्या वतन ट्रान्सपोर्टवर गुन्हा दाखल करा
भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करा, न भरल्यास मालमत्ता जप्त करा
संदीप क्षीरसागरांनी अधिवेशनात मांडला होता टँकर घोटाळा
आज पाणीपुरवठा मंत्र्यांची झाली महत्वपुर्ण बैठक
जिल्हा परिषदेचे दोषी अधिकारी-कर्मचार्यांवर होणार गुन्हे दाखल
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात टँकरद्वारे पुरविण्यात येणार्या पाण्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याच्या तक्रारी आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी लक्ष घालत अधिवेशनामध्ये आवाज उठवून लातूरच्या वतन ट्रान्सपोर्टची स्तरनिहाय चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात सत्यता समोर आली असून आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित कंत्राटदारावर आणि दोषी अधिकार्यांवर तात्काळ फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, त्याचबरोबर संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून भ्रष्टाचार करून उचललेली रक्कम तात्काळ वसूल करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कंत्राटदारासह वाहतत्या गंगेत हात धुवून घेणार्या अधिकारी, कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
इ.स. 2019-20 वर्षाकरिता बीड जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. लातूरच्या वतन ट्रान्सपोर्टमार्फत हा पाणीपुरवठा व्हायचा. मात्र प्रत्यक्षात गावकर्यांना पाणी न देता संबंधित कंत्राटदार हा बोगस बील उचलत असे. याबाबतच्या तक्रारी अनेकांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी
जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. सदरचं प्रकरण त्यांनी अधिवेशनात मांडलं होतं. त्यावेळेस आ. संदीप क्षीरसागरांनी संबंधित कंत्राटदार हा शासनाची लूट करत असल्याचे सांगून बहुतांश पंचायत समित्यांमध्ये लॉकबुक मॅनेज केले जातात, जीपीआरएस मॅनेज केले जातात, टँकरला बोगस नंबरप्लेट लावल्या जातात. एक ट्रिप टाकल्यानंतर तीन ट्रिकपची लॉकबुकला नोंद होते. अशा गंभीर बाबी त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आज पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, उपसचीव माने, अव्वर सचीव गोविल, कक्ष अधिकारी राठोड, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथील सहायक संचालक नाईकवाडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली असता पाणीपुरवठा मंत्र्यांनी संबंधित कंत्राटदारासह जिल्हा परिषदेतील दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश सचीवांना दिले आहेत. तब्बल 98 लाख रुपयांची बोगस बिले आजपावेत उचलण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी आज झालेल्या बैठकीत संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून भ्रष्टाचार केलेली रक्कम वसूल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. कंत्राटदाराने रक्कम भरली नाही तर त्याची मालमत्ता जप्त करून रक्कम जमा करून घ्यावी, असे निर्देश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आ. संदीप क्षीरसागर यांनी पुढील चौकशीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालायचा चौकशी अधिकारी नेमावा, अशी मागणी आ. क्षीरसागर यांनी केली आहे. या वेळी गेवराई येथील गटविकास अधिकारी यांचे बडतर्फीचे आदेश मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आहे.