-बीड-ऑनलाईन रिपोर्टर
बंगळुरूतील २२ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात अटक केल्या नंतर या टूल किट प्रकरणाचे बीड कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील संशयीत शंतनू शिवलाल मुळूक याच्या चाणक्यपुरीतील घराची नुकतीच दिल्ली पोलिसांनी झडती घेत त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनीही याला दुजोरा दिला.
हे नक्की वाचा, टूलकिट म्हणजे काय? ते कशासाठी आणि कसं वापरतात?
नवीन केंद्रीय कृषी कायद्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत हिंसक प्रकार घडला. आंदोलना दरम्यान टूल किट चे प्रकरण समोर आले असून यामध्ये शहरातील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावरही गुन्हा नोंद झाला आहे. त्याच्या चौकशी साठी दिल्ली पोलिसांचे पथक नुकतेच बीडमध्ये येऊन गेले. पोलिस निरीक्षक सज्जनसिंग यांचे पथक पहाटेच शंतनु मुळूकच्या घरी पोचले. त्यांनी वडिल माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक व आई हेमलता मुळूक यांची चौकशी करुन त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली. तसेच त्याचा अलिकडे आलेल्या संपर्काचीही माहिती घेतली. तसेच वडिलांना घेऊन पथक औरंगाबादलाही गेले. बँकेत जाऊन त्याच्या बँक खात्याचा तपशीलही दिल्ली पोलिसांनी घेतला. दरम्यान, दिल्ली पोलिस आल्याचे आणि त्यांची चौकशी करुन गेल्याचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी सांगीतले. तर, शंतनू हा पर्यावरण प्रेमी असल्याचे सांगत त्याने आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून गुन्हा नोंद करुन त्याची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप शिवलाल मुळूक यांनी केला. पोलिस आल्याचे सांगून त्यांना तपासात सहकार्य केल्याचे श्री. मुळूक म्हणाले. शंतनू हा ‘बीई’ मॅकेनिक आहे. तसेच त्याने अमेरिकेत एमएस ची पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धना संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. शेतकऱ्यांच्या संदर्भात तळमळ असून शेतकरी आंदोलनाला शोषल मीडिया च्या माध्यमातून तो पाठींबा देत होता. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मीही शेतकऱ्याची मुलगी म्हणून पाठींबा दिल्याचे आई हेमलता मुळूक म्हणाल्या. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी कुटूंबियांत झालेल्या एक लग्न सोहळ्यासाठी शंतनु बीडला आला होता. तेव्हाच त्याची आई – वडिलांशी भेट झाली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क नसल्याचे दोघांनी सांगीतले. सुरुवातीला औरंगाबाद मध्ये नोकरी करणारा शंतनू अलिकडे पुण्याला काही तरी नवीन करण्यासाठी गेलेला आहे.