परळी (रिपोर्टर) येथील महाराष्ट्र बँकेला आज सकाळी अचानक आग लागली. सदरील घटनेची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर अनेक जण तेथे दाखल झाले होते. पत्रकारही घटनास्थळी गेले असता एपीआय गिते यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याने पत्रकारात संताप व्यक्त केला जात आहे. सदरील पोलीस अधिकार्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
परळी शहरातील महाराष्ट्र बँकेला आज सकाळी आग लागली होती. घटनेची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांसह अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. वृत्त संकलनासाठी काही पत्रकारही बँकेमध्ये गेले होते. त्यावेळी एपीआय नारायण गिते यांनी रिपोर्टरचे पत्रकार धिरज जंगले व पत्रकार अभिमन्यू फड या दोघांना धक्काबुक्की केली. ‘आम्ही पत्रकार आहोत’, असे सांगितल्यानंतरही गिते यांनी ऐकले नाही. पोलीस अधिकार्यांच्या या अरेरावीपणाचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला असून त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.