पुणे (रिपोर्टर) बारामतीच्या पवार कुटुंबीयांच्या कौटुंबिक कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत असते. राजकारणात असतानाही कुटुंबाने जपलेला एकोपा नेहमीच कौतुकास्पद ठरला आहे. नुकतेच कृषी विकास प्रतिष्ठानच्या ऑलिम्पिक जलतरण तलाव उद्घाटनाचा कार्यक्रम पवार कुटुंबीयांच्या किश्श्यांनी गाजला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तर, अजित पवारांनी दादास्टाईल फटकेबाजी करत उपस्थित विविध संस्थांच्या चेअरमन आणि खासदार सुप्रिया सुळेंनाही शरद पवारांसमोरच ऐकवल्याचं पाहायला मिळालं.
बारामतीमध्ये बनविण्यात आलेल्या जलतरण तलावाचं आणि त्याच्या क्वॉलिटी व किंमतीचं गणित अजित पवारांनी मांडलं. या जलतरण तलावासाठी, डायरेक्ट कुठं कुठं साहेबांच्या ओळखी असतील, आमच्या ओळखी असतील. तिथून टाईल्स असेल, सिमेंट असेल, किंवा स्टील असेल ते आणण्याचा प्रयत्न केला. 7 कोटी रुपयांचं काम 5 कोटी रुपयांत केलं, तेही दर्जेदार. कुणीही तिथं जाऊन एखादी चूक दाखवावी की इथं कमी झालंय, मी तुमचं म्हणेल ते ऐकेल. इथ बसलेल्या अनेक संस्थांच्या चेअरमनला मला हे आवर्जून सांगायचंय, असे म्हणत कार्यक्रमात उपस्थित अनेक संस्थांच्या पदाधिकार्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावलं. तसेच, नुसतं चेअरमनपद भूषवायचं नाही, अशी काटकसर करायची, असा सल्लाही दिला.