सामाजिक जडणघडणीसह प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विचाराचे पाईक व्हा -धर्मगुरू
बीड (रिपोर्टर) चर्हाटा फाटा परिसरात कालपासून सुरू झालेल्या शेकडो एकरवरील इज्तेमामध्ये विविध मुस्लिम धर्मगुरूंनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या आचारविचारांची पेरणी करत सामाजिक जडणघडणीसह प्रेषितांच्या विचारांवर चालण्याचे उपस्थित लाखो भक्तांना उद्बोधन केले. प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा यकीन करो, हा मुलमंत्र जपा, भक्ती मार्गात या, चांगले काम, चांगले विचार अंगीकारत अखंड मानवजातीचे कोटकल्याण करण्यासाठी अल्लाहने दाखवून दिलेल्या मार्गावर चाला, असे मुलमंत्र दिले. धर्मगुरुंच्या या उद्बोधनावर इज्तेमासाठी आलेले लाखो भाविक मंत्रमुग्ध झाले. काल दहा जोडप्यांचे निकाह झाले तर आज तब्बल 54 जोडप्यांचे निकाह या इज्तेमामध्ये होणार आहेत.
प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे विचार सांगण्यासाठी देशभरातून आलेल्या धर्मगुरुंचे प्रबोधन ऐकण्यासाठी बीड जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव काल बीडच्या चर्हाटा फाटा परिसरामध्ये डेरेदाखल झाले. प्रेषित आणि भक्तांचा हा सोहळा याची देही याची डोळा पाहताना सर्वांनाच कौतुक वाटत होते. इज्तेमा आयोजक समितीकडून आखण्यात आलेले नियोजन काटेकोर असल्याने स्वयंसेवक अत्यंत पोटतिडकीने आपल्यावर दिलेल्या कामाची जबाबदारी फत्ते करत होते. जिथे तिथे शिस्त पहावयास मिळत होती. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी अखंड जगाला ‘यकीन करो’ चा मुलमंत्र दिला म्हणजेच विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्याच संदेशाच्या आधारावर आणि प्रेषितांचे मार्गदर्शन धर्मगुरुंच्या वाणीतून ऐकण्यासाठी लाखो भक्तांची मांदियाळी पहावयास मिळत होती. आज इज्तेमाचा समारोपाचा दिवस. आजच्या दिवशी अल्लाहच्या नावाचे नामस्मरण, दिन आणि दावतसाठी प्रशिक्षण यासह सायंकाळी अखंड मानवजातीसाठी दुवॉचा कार्यक्रम होणार आहे. इज्तेमामुळे बीड शहरात भक्तीभावाचे वातावरण पहावयास मिळत आहे.