बीड (रिपोर्टर) : जैन समाजाचे झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी सिद्धक्षेत्र हे पवित्रस्थान आहे. याला केंद्र आणि राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले असून हे परिपत्रक परत घेण्यात यावे, सदरील स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ नये या प्रमुख मागणीसाठी आज बीड शहरातील जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला होता. जैन समाजाने याच्या निषेधार्थ आपआपले व्यवहार बंद ठेवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.
पुरातन काळापासून चालत आलेला जैन धर्म हा स्वतंत्र धर्म आहे. या धर्मातील 24 तीर्थकारांपैकी 20 तीर्थकर ज्या सिद्धेश्वरांवरून मोक्षास प्राप्त झाले ते झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी सिद्धक्षेत्र हे पवित्र आहे. या ठिकाणी लाखो भावीक दर्शनास येतात. अशा पवित्र तीर्थस्थळास केंद्र व राज्य सरकारकडून पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले. या निर्णयाचा जैन समाजाकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ आज जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये संपादक विजयराज बंब, नितीनचंद्र कोटेचा, बाबूसेठ लोढा, नरेंद्र महाजन, अशोक लोढा, बाबूसेठ खिंवसरा, सुभाषचंद्र समदरीया, गौतम खटोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. मोर्चा सकाळी साडेदहा वाजता जैन भवन या ठिकाणावरून निघाला होता. या मूकमोर्चामध्ये महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.










