बीड (रिपोर्टर) सरकारी कर्मचार्याच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपीला बीड जिल्हा न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा व पाचशे रुपये दंड ठोठावला आहे.
जातेगाव ते गोळेगाव रोडवरून गोळेगावकडे जाताना नदीच्या जवळ दि. 22 मे 2016 रोजी आरोपी लहू याने बेकायदेशीररित्या गोदावरी नदी पात्रातून शासनाच्या मालमत्तेचं उत्खनन करून वाळू विनापरवाना ट्रॅक्टरमधून घेऊन जात असताना वाळू पथकातील कर्मचारी मधुकर मारुतराव गायकवाड (मंडल अधिकारी, विभाग रेवकी तथा अवैध वाळू विशेष भरारी पथक, तहसील गेवराई) यांना यांना दमदाटी करून शिवीगाळ केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील हा गुन्हा तलवाडा पोलिसात दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा पोलीस नाईक मिसाळ यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला. तपासा दरम्यान त्यांनी पंचनामा करून सदर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयासमोर झालेला पुरावा व सरकारी वकील अजय तांदळे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी लहू अंबादास किरकट यास जिल्हा व सत्र न्यायाधीश महाजन यांनी कलम 353 भा.दं.वि.नुसार दोषी धरून आरोपीस कलम 353 व 379 अन्वये सहा महिने प्रत्येकी शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपये दंड व कलम 279 भा.दं.वि.प्रमाणे तीन महिने शिक्षा व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना दोषसिद्धी कक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जायभाये आणि सहायक फौजदार इंगळे, महिला पोलीस अंमलदार अनुराधा गव्हाणे, एस.ए. चव्हाण, अर्चना सिंघण यांनी सहकार्य केले.