मृत्यूशी झुंज देणार्या प्रशांतला मदतीचा गरज
अपघातग्रस्त प्रशांतचा जीव वाचविण्यासाठी वर्गमित्रांची धडपड, मदत फेरी काढत पैसे जमविण्याचा प्रयत्न
बीड : (रिपोर्टर) घरी अठरा विश्व दारिद्र्य… बाप सालगडी… तीन मुलीचे हात पिवळे केले, एकुलता एक मुलगा हुशार निघाला शासकीय कोट्यातून डी-फार्मसी ला नंबर लागला. मुलाने पहिल्या वर्षात चांगले मार्क मिळवले दुसर्या वर्षात ऍडमिशन घेतलं मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, हसता खेळता प्रशांत एका अपघातात गंभीर जखमी होतो अन् कोमात जातो. रोज काम केल्याशिवाय चूल न पेटवणारा बप त्याच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च कसा करणार म्हणून त्याचा मित्रपरिवार एकवटला अन् मदतीसाठी दारोदार फिरू लागला. काल बीड शहरात मदत फेरी काढली. मात्र हे मित्र किती लोकांपर्यंत पोहोचणार त्यामुळे आम्ही रिपोर्टरच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींना आवाहन करत आहोत की आपल्या छोट्याशा कृतीने प्रशांतचा जीव वाचणार असेल तर आपण सढळ हाताने नक्कीच मतद करावी.
प्रशांत रमेश राऊत (वय 20 वर्ष रा. बोरगाव ता. केज जिल्हा बीड) असे अपघातग्रस्त तरुणाचे नाव आहे. प्रशांतचे वडील रमेश राऊत हे गावातीलच एका ब्राह्मण समाजाच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. राऊत यांना चार अपत्य आहेत. त्यामध्ये तीन मुली आणि एकुलता एक प्रशांत तिन्ही मुलीचे राऊत यांनी हात पिवळे केले. प्रशांतला शिकून मोठं करायचं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेले आहे. त्यामुळे ते उतरत्या वयातही सालगडी म्हणून दुसर्याच्या शेतात राब-राब राबतात. प्रशांत हा हुशार विद्यार्थी त्याने त्याच्या हुशारीच्या जोरावर शासकीय कोट्यातून गडी येथील डी-फार्मसी कॉलेजला अॅडमिशन मिळवलं. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने प्रशांत ने शिक्षण घेत असतानाच कमवा आणि शिका कॉलेजमधील अशा विविध उपक्रमात भाग घेऊन आपली आर्थिक गरज भागू लागला. हुशार प्रशांत सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे. दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी प्रशांत काही कामानिमित्त गेवराईला जात असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या मेंदूला, छातीला व कंबरेला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला आहे. यात त्याचा एक पाय मोडला असून बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये तो मृत्यूशी झुंज देत आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तेथे त्याला उपचार न परवडणारे आहेत. मात्र दुसरा पर्याय नाही बीमधून पुणे- मुंबई- औरंगाबादला हलवितांना धोका होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. अन् इथला खर्च न परवडणारा आहे. प्रशांतच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मित्रपरिवाराला अगोदरच माहिती होती. कॉलेजला सुट्टी असल्याने गावी गेलेल्या मित्र-मैत्रिणींना सामाजिक कार्यकर्ते ओम कडपे यांनी प्रशांतच्या अपघाताची माहिती देताच अमोल भोपळे, श्रध्दा कचरे, जयश्री चव्हाण, अभी देवडे, पवन राठोड, अजय मगर, लक्ष्मी आऊटे, कोमल, मुकुंद बीडकर, नंदा बदर यांच्यासह आदींनी स्वतः होईल तेवढी मदत करत गेवराई शहरासह बीडमध्ये मदत फेरी काढली. मात्र ते किती जणांना भेटणार? गरज लाखात आहे. मदत फेरीतून किती रुपये गोळा होणार हा मोठा प्रश्न आहे? मात्र हे मुलं मित्राचा जीव वाचवावा, पैशामुळे त्याचे उपचार थांबू नयेत यासाठी गेल्या दोन दिवसापासून दारोदार फिरत आहेत. आम्ही रिपोर्टरच्या माध्यमातून दानशूरांना आवाहन करीत आहोत की साल गड्याच्या पोराचे पैशाअभावी उपचार थांबवू नयेत यासाठी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने प्रशांतला मदत करावी.
दानशुरांनी येथे मदत करावी
बँक खाते क्रमांक :60305962159 आयएफएससी कोड च-कइ0001038 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गढी ता. गेवराई जि. बीड खातेदार नाव: ओम सेवाभावी संस्था फोन पे नंबर 9404934009 खातेदाराचे नाव:- प्राजक्ता जगदीश रूनवाल 8847742471 रमेश राऊतपेशंट विषयी माहिती साठी संपर्क 9545101314 ओम कडपे 8847742471 रमेश राऊत (प्रशांत चे वडील)