बीड (रिपोर्टर) सायं. दैनिक बीड रिपोर्टर व रिपोर्टर क्रीडा अकॅडमीच्या वतीने सुरू असलेल्या आरपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना एसआरके विरुद्ध बीएव्हिपी यांच्यात होत असून हा सामना पाहण्यासाठी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानावर क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून क्रीडांगण खचाखच भरल्याचे दिसून येत आहे. दुपारी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आरपीएल विजेत्या संघाला बक्षीसाने सन्मानित करण्यात येणार आहे. 24 जानेवारीपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला होता. गेली बारा दिवस चित्तथरारक आणि लक्षवेधक सामने क्रिकेट चाहत्यांना पाहता आले. फलंदाजीसह भेदक गोलंदाजीही या सामन्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांना पाहता आले. सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक तथा रिपोर्टर क्रीडा अकॅडमीचे सर्वेसर्वा शेख तय्यब यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काल उपांत्य फेरी झाल्यानंतर आज अंतिम फेरीमध्ये एसआरके विरुद्ध बीएव्हिपी असा सामना सुरू असून एसआरकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना पाहण्यासाठी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. अख्खे स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले आहे.