माजलगाव (रिपोर्टर)- शहरातील राष्ट्रीय महामार्ग-61 वर असलेल्या मार्केट कमिटी नवीन मोंढा समोर स्पीड ब्रेकरवर मोटारसायकलचा ताबा सुटल्याने समोरून येणार्या ट्रकला धडकुन एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार (दि.21) रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.
घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील शेख सलीम शेख अलीम (वय 33) हा तरुण माजलगाव येथे लग्न समारंभासाठी मोटारसायकल क्र. (एम.एच.21/बीडब्ल्यू 8186) वरुन मंगळवारी रात्री 12 वाजता परत गावाकडे निघाला होता. तो शहरातील राष्ट्रीय महामार्ग-61वर असलेल्या मार्केट कमिटी, नवीन मोंढा समोर आला असता स्पीड ब्रेकर न दिसल्याने मोटारसायकलवरचा ताबा सुटला व समोरून भरधाव येणार्या ट्रक क्र. (एम.एच.-19/झेड 1921) च्या समोर आला आणि ट्रकच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातस्थळी माजलगांव शहर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप मोरे व अमोल कदम यांनी भेट देऊन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.