बीड (रिपोर्टर): उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे समोर आले आहे. सध्या धरणातून दिवसाकाठी सुमारे 0.4 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवन होणारे पाणी माजलगाव व बीड शहराला एक दिवस पुरेल इतक.
धरणात सध्या 62.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळी हंगामासाठी उजव्या कालव्याद्वारे पहिले पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. माजलगाव धरण हे तालुक्यासह परिसरातील शेतीसाठी जीवनदायी मानले जाते. यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरण 100% भरले होते. या धरणातून माजलगाव शहर, परिसरातील 11 गावे आणि बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होत आहे. बीडचा पारा 39 अंशांवर गेला आहे. त्यासाठी शेतीसाठी असेल किंवा घरातील पाण्याचा वापर हा काटकसरीने करणे गरजेचे आहे, घाट माथ्यावरील व उंचवठ्या वरील पावसाचे पाणी सरळ नदी नाल्यात जात असेल तर ते पाणी अडवून जमिनीत जिरवणे व छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून विंधन विहिरीत साठवणे गरजेचे आहे. यंदा उन्हाची तीव्रता जास्त असून फेब्रुवारी पासूनच धरणातील पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन चिंतेची गोष्ट आहे. माजलगाव धरणातील आजचा पाणीसाठा 62 टक्यावर असला तरी अल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाचे सरासरी पर्जन्यमान घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 वर्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे.












