बीड (रिपोर्टर) भाजपाच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या सत्तीय महत्वकांक्षेला साद घालत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंशी बंड करून महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणली असली तरी बीड जिल्ह्यातल्या भाजपा आमदाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नापसंत असल्याचे सातत्याने दिसून येत असून केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रत्येक बॅनरमधून एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. राज्य शासनाने ‘आनंदाचा शिधा आता गुढी पाडवा’ या घोषणा करत शंभर रुपयात शिधा देण्याचा निर्णय घेतला. त्या बॅनरमध्ये आमदार नमिता मुंदडांनी मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो वगळल्याने बीड जिल्ह्यातील शिंदे समर्थक शिवसैनिकात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून आ. नमिता मुंदडांना हे महागात पडेल, असा निर्वाणीचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार नमिता मुंदडा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमान्य असल्याचे वेळोवेळी त्यांच्या पोस्टरबाजीतून दिसून आले आहे. यापुर्वीही महावितरणाच्या एका कार्यक्रमाच्या पोस्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायब होते. काल-परवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आनंदाची गुढी आनंदाचा (पान 7 वर)
शिधा’ देण्याची घोषणा केली. 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तब्बल 1 कोटी 63 लाख कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही महत्वपुर्ण घोषणा केली असली तरी केजच्या आमदार नमिता मुंदडांनी मात्र याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे पोस्टर काढले आहे त्या पोस्टरमधील फोटोंमधून मुख्यमंत्र्यांचा फोटो वगळला आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यासह राज्य भाजपाचे नेत्यांचे फोटो त्यात आहेत. नमिता मुंदडांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अमान्य आहेत का? असा जळजळीत सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसैनिकांनी विचारून संताप व्यक्त केला आहे.
नमिता मुंदडा मोठ्या नेत्या झाल्यात,
त्यांना हे महागात पडेल -सचीन मुळुक
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा या सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवहेलना करताना दिसून येत आहेत. याआधी एमएसईबीचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो नव्हता. नमिता मुंदडा या मोठ्या नेत्या झाल्या, त्यांना वारंवार मुख्यमंत्री शिंदेंचा विसर पडतो. असं म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांनी मुंदडांना मुख्यमंत्री मान्य नाहीत का? असा सवाल विचारला. मुख्यमंत्र्यांनी केज नगरपंचायतीला 74 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सर्वसमावेशक लोकाभिमुख मुख्यमंत्री काम करत असताना त्यांना जर भाजप आमदाराकडून डावलण्यात येत असेल तर त्या आमदाराला महागात पडेल, असा थेट इशारा सचीन मुळुक यांनी दिला आहे.