Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोना…तर जिल्हाधिकार्‍यांवर कारवाई -उद्धव ठाकरे

…तर जिल्हाधिकार्‍यांवर कारवाई -उद्धव ठाकरे


कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक द चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत. कोणत्याही पातळीवर कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नाहीतर थेट जिल्हाधिकार्‍यांवरच कारवाई केली जाईल, या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकार्‍यांची हजेरी घेतली.
ब्रेक द चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष व पातळ्या निश्चित करणार्‍या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग हा विविध सण-उत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढला होता, या वेळेस दुसरी लाट सणावारांच्या अगोदर आली आहे. म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. नाहीतर राज्यात तिसर्‍या लाटेत मोठे आव्हान उभे राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, दुसर्‍या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेवर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पावले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.
शंका असेल तर निर्बंध चालू ठेवा
कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण स्तर ठरविले असले तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला. कुठल्याही दबावाला बळी पडू नका, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनांना दिला आहे.
कोरोनामुक्त गावांची टक्केवारी गृहीत धरणार
ग्रामीण भागात कोरोना वाढतोय, त्याला रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गाव करा म्हणून आवाहन केले आहे. या कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!