घरगुती दरात 6 टक्क्यांची जबर वाढ
मुंबई (रिपोर्टर) राज्यातल्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. वीज वितरण कंपन्यांनी वीज दरवाढीचा निर्णय आजपासून लागू केला असून, त्यामुळे घरगुती दरात 6 टक्क्यांची वाढ केली आहे. आधीच महागाईच्या आगीत होरपळणार्या सामान्यांना हा मोठा झटका आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरने ही दरवाढ केली आहे. त्यासाठी आर्थिक तोट्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के, तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के, तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ असेल. बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के झाली आहे. 2024-25 साठी 6.35 टक्क्यांची दरवाढ असेल.
अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के दरवाढ झाली आहे. त्यात 2023-24 साठी 2.1 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी (पान 7 वर)
11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाल्याचे समजते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. महावितरण अर्थातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महावितरण मुंबईतील काही क्षेत्रांसह, महाराष्ट्रात विजेचे वितरण करणारी एक परवानाधारक आहे. महावितरणची आर्थिक वर्ष 2019-2020, 2020-21 आणि 2021-22 करिता अचूक समायोजन 2022-23 करिता तात्पुरते अचूक समायोजन तसेच 2023-24 आणि 2024-25 या नियंत्रण कालावधीकरिता अंदाजित एकूण महसुली गरज आणि वीज दरास मंजुरीसाठीची वीज दर याचिका 24 जानेवारी, 2023 रोजी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दाखल करून घेतली.
आजपासून दर लागू
महावितरण पुढे म्हणते की, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या आणि 21 फेब्रुवारी, 2023 ते 03 मार्च, 2023 दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक जाहीर सुनावण्या घेतल्या. जनतेशी सल्लामसलतीच्या या प्रक्रियेनंतर आयोगाने 31 मार्च, 2023 रोजीच्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष 2023 – 24 आणि 2024-25 साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक 1 एप्रिल 2023 पासून अंमलात येतील.